केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) अधिकाऱ्यांनी अलिकडच्या काही महिन्यांत देशभरातील अनेक कापड उत्पादक कंपन्यांची कापड प्रक्रियेचे चुकीचे वर्गीकरण करून कमी कर भरल्याबद्दल चौकशी सुरु केली आहे.
माहितगार सूत्रांनुसार, केंद्रीय जीएसटी विभागाने असे निरीक्षण नोंदवले आहे की अनेक कापड उत्पादक 'कापडाचे स्वरूप बदलणे' यासारख्या प्रक्रियाना 'धुणे आणि रंगवणे' असे दर्शवून कमी दराने कर भरत आहेत.
`जीएसटी कायद्यांतर्गत, वस्त्रोद्योगात 'धुणे आणि रंगवणे' (वॉशिंग आणि डाईंग) यास 'जॉब वर्क सर्व्हिसेस' मानले जाते आणि त्यावर ५% जीएसटी दर आकारला जातो; तर ब्लीचिंग, प्रिंटिंग किंवा त्याच्या आवश्यक वैशिष्ट्यांमध्ये बदल करणाऱ्या, कापडात लक्षणीय बदल करणाऱ्या प्रक्रियांवर १८% जीएसटी दर आकारला जातो.
"काही वस्त्रोद्योग उत्पादक जाणूनबुजून सेवांचे चुकीचे वर्गीकरण करत आहेत आणि ५% कर भरत आहेत, जिथे त्यांना १८% कर भरावा लागतो. सीजीएसटी अधिकारी भारतातील सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या (कॉर्पोरेट, लघु आणि मध्यम कंपन्या) युनिट्सची चौकशी करत आहेत,” असे सूत्रांनी सांगितले.
कर तज्ञांचे म्हणणे आहे की वस्त्रोद्योगात जीएसटीचे चुकीचे वर्गीकरण कर स्लॅबमधील अस्पष्टतेमुळे उद्भवत आहे. काही उत्पादकांनी ५% श्रेणी अंतर्गत परिवर्तनात्मक प्रक्रियांचे चुकीचे वर्गीकरण केले आहे. ही समस्या अनेक जीएसटी दर, अस्पष्ट व्याख्या आणि संभाव्य गैरवापरामुळे उद्भवली आहे.