बेळगाव शहरातील टिळकवाडी, कॅम्प, मार्केट, शहापूर व उद्यमबाग आदी परिसरातील पाच उद्योजकांच्या घरांवर व कार्यालयांवर प्राप्तिकर छापे टाकण्यात आले. मंगळवारी पहाटे पाच वाजता एकाचवेळी सर्वत्र छापे पडल्याने शहरात खळबळ उडाली. गोवा येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरातील साखर उद्योग, कॅटल फीड तसेच फाउंड्री उद्योग यातील बड्या उद्योजकांच्यावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही वाहने टिळकवाडी, उद्यमबाग, शहापूरसह शहरात ठिकठिकाणी दाखल झाली. काही कळण्याच्या आतच या प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना बोलावून घेतले. यानंतर घरातील मंडळींना उठण्याआधीच जागे करून कार्यवाहीला प्रारंभ केला. सर्वांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी, दागिने, रोकड यांची मोजदाद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. बेळगावात छाप्यासाठी बंगळूर व गोव्याची विशेष पथके यासाठी आली आहेत.