१०.८३ कोटींचा जीएसटी' बुडविल्याप्रकरणी व्यापारी अटकेत- न्यायलयाने जामीन फेटाळला

GST 4 YOU

 सोलापूर येथे खोटी खरेदी दाखवत ८०.१८ कोटी रुपयांच्या उलाढालीत तब्बल १०.८३ कोटी रुपयांचे इनपूट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून त्याद्वारे जीएसटी बुडविणाऱ्या दोन व्यापाऱ्यांचा तात्पुरता जामीन न्यायलयाने  फेटाळला. दरम्यान, दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
    श्रीकांत सुरेंद्र लड्डा (वय ३५), लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा (३७, दोघे रा. नाकोडा युनिटी फेस २, जुना पूना नाका, सोलापूर), असे जामीन फेटाळलेल्या दोन व्यापारी भावांची नावे आहेत. श्रीकांत लड्डा हे मे. एस. आर. एल ऑईल प्रा. लि. सोलापूरचे संचालक आहेत. दोघे बनावट कंपन्यांकडून व्यवहार करीत होते. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रजिस्टरमध्ये आवक-जावकच्या नोंदी ठेवल्या नाहीत.
 मुंबई, पुणे, ठाणेसह मध्य प्रदेश, गुजरातमधील काही शहरांमध्ये व्यवहार केल्याचे राज्य वस्तू व सेवा कर विभाग(जीएसटी) च्या लक्षात आले. 'जीएसटी'च्या पथकाने ८ जानेवारी रोजी त्यांना व त्यांच्या भावाला  वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायदा २०१७ अंतर्गत अटक केली आहे. याप्रकरणी राज्य कर विभागाने फिर्याद दिली होती . 
   अशा प्रकारे खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाचा जीएसटी (वस्तू व सेवा कर) बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आजतागायत १२ ते १३ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, असा इशारा राज्यकर विभागाने  दिला आहे.