बेदाण्यावरील जीएसटी रद्द करा-आ. रोहित पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

GST 4 YOU


शीत गृहा मध्ये ठेवलेल्या बेदाणा भाड्यावरती शासनाकडून १८% जीएसटी असून व बेदाणा विक्रीवर ५% जीएसटी असा  जीएसटी  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत असल्याने तो माफ करावा, अशी मागणी आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.
    मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात द्राक्ष पीक घेतले जात आहे. या सर्व तालुक्यात मिळून सुमारे ३१ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पिकाची लागवड असून शेतकरी तयार द्राक्षापासून बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणात करून, त्याला दर मिळण्याच्या अपेक्षेने तयार बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवत असतात. त्यांना जीएसटीचा मोठा फटका बसत आहे.
    द्राक्ष पीक घेण्यासाठी भरपूर प्रमाणात औषधे फवारणी करावी लागते. त्या औषधांवरही  १८ टक्के जीसटी असल्याने शेतकऱ्यांची मोठी रक्कम जीएसटीसाठी जात असल्याने द्राक्षाची औषधे, कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला बेदाणा व त्याच्या  विक्री वर बसविलेला जीएसटी माफ करावा अशी मागणी करण्यात आली आहे.