वस्तू व सेवा कर कायद्यातील तरतुदी अंतर्गत कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना राज्यात लागू करण्यात आली असून ३१ मार्च २०२५ ही देय रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. देय रकमेचा भरणा मुदतीत केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होणार असल्याने कर दात्यानी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी नागपूर येथे केले. ही योजना २०१७-१८, २०१८-१८ आणि २०१९-२० या तीन वर्षांसाठी जाहीर करण्यात आली आहे.
योजने संदर्भात अधिक माहिती देताना उप मुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, राज्य कर विभागाच्या अखत्यारीतील करदात्यांकडून साधारण १ लाख १४ हजार अर्ज अपेक्षित आहेत. विवादित रक्कम ५४ हजार कोटी रुपयांची आहे. त्यापैकी विवादित कर २७ हजार कोटी रुपयांचा तसेच दंड व शास्तीची रक्कम २७ हजार कोटी रुपयांची आहे. विवादित कराच्या सुमारे २० टक्के रक्कम योजनेमध्ये जमा होते. त्यानुसार, या योजनेमध्ये ५ हजार ५०० ते ६ हजार कोटी रुपये रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. यापैकी २ हजार ७०० ते ३ हजार कोटी रुपये राज्य सरकारला मिळतील. उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडे जमा होईल. या योजनेमुळे अशा करदात्यांना ५ हजार ५०० ते ६ हजार कोटी रुपयांच्या व्याज व दंडातून दिलासा मिळेल, असे पवार यांनी सांगितले.