आगामी जीएसटी परिषदे च्या बैठकीत कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधित्व- जैसलमेर येथे २० व २१ डिसेंबर रोजी होणार बैठक

GST 4 YOU


जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४ च्या जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत नवनियुक्त कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडून जीएसटी बाबत सविस्तर आढावा घेतला.
      या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्मा , सह आयुक्त किरण शिंदे यांचे सह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री तटकरे यांनी यापूर्वी झालेल्या जीएसटी परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने सुचवलेल्या सुधारणा, नव्याने सुचवावयाच्या सुधारणा, करांमध्ये विविध उद्योग, घटक यांना द्यावयाची सूट तसेच कररचनेमध्ये सुलभता आणि करदात्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असण्याबाबतची माहिती घेतली. इलेक्ट्रिक वाहने, विमा हप्ते, कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांना करांमध्ये सूट देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काही क्षेत्रांमध्ये करावयाची करकपात आणि करवाढ, त्यामुळे महसुलामध्ये येणारा फरक याची माहितीही मंत्री तटकरे यांनी यावेळी घेतली. 
जैसलमेर येथे २० व २१ डिसेंबर २०२४ अशी दोन दिवस ही जीएसटी परिषद होणार आहे. तसेच या परिषदे वेळी राज्यांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षांची चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे.