गुरुवारी दुपारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील माजी खासदार कादिर राणा यांच्या राणा स्टील कारखान्यावर छापा टाकण्यासाठी आलेल्या केंद्रीय जीएसटी च्या मेरठ येथील पथका वर कर्मचारी आणि जमावाने हल्ला केला.
यावेळी दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि मारहाण करून पथकाला ओलीस ठेवण्यात आले. माहिती मिळताच पोलीस अधिक्षक ही अनेक पोलिस ठाण्यांच्या फौजफाट्यासह दाखल झाले आणि जमावाला पांगवले. या प्रकरणी डीजीजीआय मेरठच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी माजी आमदार शाहनवाज राणा, सपा नेते आणि माजी खासदार कादिर राणा यांच्या दोन मुलींसह चौघांना अटक केली आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदाराच्या दोन्ही मुलींना संध्याकाळी कोर्टातून जामीन मिळाला. उर्वरित दोन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.
एफआयआरनुसार, गुरुवारी मेरठ झोन कार्यालयातील सेंट्रल जीएसटी टीम शोध वॉरंटसह मुझफ्फरनगर पोलिस स्टेशनच्या सिव्हिल लाइन भागातील राणा स्टील फॅक्टरीमध्ये पोहोचली. मुख्य गेट उघडल्यानंतर पथक कारखान्यात पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित माजी खासदार कादिर राणा यांचा मुलगा शाह मोहम्मद याने कागदपत्रे एका पिशवीत ठेवली आणि भिंतीवरून उडी मारून पळून जाऊ लागला. जीएसटी टीमचा भाग असलेल्या पंकज त्यागी आणि जयचंद यांनी त्याला बेस्ट रोलिंग मिलजवळ पकडले. शाह मोहम्मद राणा याला पथकाने गाडीत बसवताच काही लोकांनी त्याला जबरदस्तीने सोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर कारखान्यात उपस्थित शेकडो कर्मचारी आणि जमावाने सेंट्रल जीएसटी टीम वर हल्ला केला.