बोगस बिलांच्या आधारे जीएसटी चुकवून शासनाचा शंभर कोटींहून अधिकचा महसूल बुडवणाऱ्या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे. एका लूट प्रकरणाच्या तपासातून ही बाब उघड झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँक घोटाळ्यातील कुख्यात बंधू हे या रॅकेटचे सूत्रधार असून या प्रकरणातील एकजण बुलढाण्याहून एका व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून वर्धमाननगर येथील संशयित यांच्या कार्यालयात मित्रा बरोबर २६ ऑगस्ट रोजी पैसे घेण्यासाठी नागपुरात आला असता त्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दोघांना ११.९० लाख रुपये दिले. टॅक्सीने ते दोघे बुलढाण्याला जाताना सायंकाळी सात वाजता वर्धा मार्गावर दोन तरुणांनी टॅक्सी थांबवली. त्यांनी चाकूचा धाक दाखवून नोटांची पिशवी हिसकावली व पळ काढला. त्यांनी धंतोली पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. संशयिताच्या माणसांनी त्याच्यावर पोलिस ठाण्याच्या बाहेरच प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला. घटनेची माहिती मिळताच पोलिस सावध होऊन त्यानी घटनेच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकी क्रमांकाच्या आधारे एकास पकडण्यात आले. त्याच्या सूचनेवरून कथित लूट करण्यात आली होती. पोलिसांनी त्यानंतर एकामागोमाग एक एकूण सात आरोपींना अटक केली.
काय आहे मोड्स ऑपरेंडी
• सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे सूत्रधार बंधूंनी शहरातील एका प्रसिद्ध बँक घोटाळ्यात मोठा हात मारला होता. या घोटाळ्यात सहभागी असलेला संशयित अनेक दिवसांपासून फरार आहे. त्याच्या मदतीने दुसरा भाऊ जीएसटी रॅकेट चालवत आहे. लोकांना बनावट बिले बनवून दरमहा करोडो रुपयांचा जीएसटी बुडविला जातो.
•या रॅकेटमुळे १०० कोटींहून अधिकचा महसूल बुडाल्याचे समोर आले आहे. घरी बसून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हा सूत्रधार छोट्या व्यावसायिकांना आणि इतर लोकांना गुंतवणूक करायला सांगून जाळ्यात ओढतो. पीडित व्यक्तीला नफ्याची रक्कम घेण्यासाठी कार्यालयात बोलावले जाते. परत जात असताना त्याला लुटण्यात येते. या घटनेची तक्रार केल्यावर त्याला जीएसटी रॅकेटमध्ये अटक होण्याची भीती वाटते. या चिंतेमुळे बहुतांश पीडित तक्रार नोंदवत नाहीत.
• या लुटीमध्येदेखील प्रकरण बाहेर निपटविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. या रॅकेटमुळे शहरातील अनेक छोटे व्यावसायिक दिवाळखोर झाले आहेत. हे रॅकेट वर्षानुवर्षे सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.