वैध बँक खात्याचा तपशील दिल्याशिवाय करदात्यांना येत्या एक सप्टेंबरपासून 'जीएसटीआर-१' हे विवरणपत्र भरता येणार नाही. 'जीएसटी'च्या 'नियम १० अ' नुसार, करदात्याने नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत वैध बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे की जीएसटीआर-१ विवरण पत्र भरल्याशिवाय पुढील ग्राहकास आवक कर परतावा (इनपुट टॅक्स क्रेडिट) घेता येत नाही.
जे जीएसटी करदाते वैध बँक खात्याचा तपशील सादर करणार नाहीत, त्यांना एक सप्टेंबरपासून जीएसटी अधिकाऱ्यांकडे बाह्य पुरवठा विवरणपत्र 'जीएसटीआर-१' दाखल करता येणार नाही. वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) बोगस आणि फसव्या नोंदणीच्या समस्येला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आणि नोंदणी प्रक्रिया बळकट करण्यासाठी; तसेच हे प्रकार प्रभावीपणे हाताळण्यासाठी जीएसटी परिषदेने गेल्या वर्षी
जुलैमध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत 'नियम १० अ' मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली होती. या दुरुस्तीनुसार, नोंदणीकृत करदात्याने नोंदणी प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत किंवा 'जीएसटीआर १' मध्ये बाह्य पुरवठ्याचे स्टेटमेंट दाखल करण्यापूर्वी आपले नाव आणि पॅन असलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.