पुण्यात जीएसटी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस- दोन आरोपींना अटक - शासकीय कंत्राटदाराचा सहभाग उघड

GST 4 YOU

केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) पुणे-II आयुक्तालयाच्या करचोरी प्रतिबंधक पथकाने जीएसटी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी फक्त कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष माल न देता बनावट बिले देऊन तब्बल 20 कोटी रुपयांचे अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले होते.

आरोपींकडून आतापर्यंत त्यापैकी 3.25 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
पुण्यातील दोन मुख्य सूत्रधारांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. औपचारिक आणि अनौपचारिक बँकिंग चॅनेलचा वापर करून या सिंडिकेटने सरकारची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. बनावट चलन व्यवहारात शासकीय कंत्राटदारही गुंतलेले असल्याचे आढळून आले आहे.
सीजीएसटी ,पुणे II आयुक्त कार्यालयातील  पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. बनावट बिले जारी करून अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट पास करणाऱ्या विविध बनावट कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ कागदावर असलेल्या या कंपन्या एका सिंडिकेटद्वारे चालवल्या जात होत्या. वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता खोटी बिले देऊन अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केले गेले.ही माहिती विभागातर्फे जारी प्रसिद्ध पत्रकात दिली आहे.