अनेक राज्यांत शाखा असलेल्या सहकार क्षेत्रातील नामवंत अशा कॉसमॉस सहकारी बँक, पुणे च्या उपाध्यक्षपदी संचालक सीए यशवंत कासार यांची निवड करण्यात आली आहे. बँकेचे आधीचे उपाध्यक्ष प्रवीणकुमार गांधी यांनी नवीन संचालकांना संधी देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत कासार यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली.
यशवंत कासार हे सनदी लेखापाल असून, कर, कायदे आणि वित्त क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय परिषदेचे प्रादेशिक सदस्य आहेत, तसेच २०१९ पासून बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
तर बँकेच्या सेवक प्रतिनिधीपदी बँकेचे व्यवस्थापक उदय लेले यांची नियुक्ती करण्यात आली. लेले हे गेल्या तीस वर्षांपासून बँकेत कार्यरत असून, कॉसमॉस बँक सेवक संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.