बांधकाम व्यावसायिक, सराफावर नाशिकात धाडसत्र - 30 तास मोहीम - आयकर कारवाईत कोट्यवधींचे घबाड- 26 कोटींची रोकड ताब्यात

GST 4 YOU


    आर्थिक माहिती दडवल्याच्या संशयातून आयकर विभागाने शहरातील नामांकित सराफासह बांधकाम व्यावसायिकावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांचे तपशील  बाहेर  आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 
     आयकर विभागाची  झडती, शोध मोहीम  सुरूच असून, त्यात महत्त्वाची कागदपत्रे तसेच काही 26 कोटींची रोकड ताब्यात घेतल्याचे समजते. आयकर विभागाच्या या धाडसत्रामुळे शहरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
    आयकर विभागाकडून नाशिकमध्ये सातत्याने धाडसत्र सुरू  असून  सराफ तसेच बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून समोर आले आहे. तसेच या व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपयांची मायादेखील जप्त केली आहे.
    शहरातील कॅनडा कॉर्नर येथील नामांकित सराफासह बांधकाम व्यावसायिकाच्या व्यवहाराची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी  छाननी केली.यावेळी कार्यालय तसेच निवासस्थानावर छापा टाकत महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह काही रोकड जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. 
 आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही सराफ व बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणची तपासणी करण्यासाठी दालने बंद केली आहेत. सोने-चांदी खरेदीसह दागिन्यांचे व्यवहार दडवणे आणि हवाला रॅकेटचा संशय पथकास असून, त्यादृष्टीने अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. तपासासाठी गेल्या दोन दिवसांपासून 50 हून जास्त अधिकारी असलेले आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये तळ ठोकून असून, दोघांच्याही व्यवहारांचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
आयकर विभागाच्या दोन पथकांकडून स्वतंत्रपणे तपास केला जात आहे. त्यातील  पथकानी  मनमाड , नांदगाव येथे कसून तपास करून त्या ठिकाणाहून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.