राज्य जीएसटी विभागाकडून ६.४० कोटीचा जीएसटी घोटाळा उघडकीस- दोन संचालकांना अटक

GST 4 YOU


महाराष्ट्र सरकारच्या वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे.

बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेंतर्गत मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा. लि च्या दोन संचालकांना मंगळवारी अटक करण्यात आली, अशी माहिती राज्य कर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी दिली.

या कंपनीविरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. कारवाईदरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केली आहे.

या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच मालाशिवाय फक्त बिले देऊन ३.१७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.

महानगर दंडाधिकारी यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि राज्य कर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली.