जीएसटी महसूल-देशात मार्च महिन्यात आजवरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक 1.78 लाख कोटी रुपये इतके मासिक संकलन; गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.5% वाढ

GST 4 YOU

मार्च 2024 महिन्यात 11.5% वार्षिक वाढीसह 1.78 लाख कोटी रुपये इतके आतापर्यंतचे दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाचे एकूण वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन म्हणजे जमा झाले आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात 17.6% इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळे हे विक्रमी संकलन झाले आहे. मार्च 2024 मध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये इतका आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 18.4% वाढलेला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मजबूत सातत्यपूर्ण कामगिरी झाली असूनआर्थिक वर्ष 2023-24 हा एक मैलाचा दगड ठरला असून या कालावधीतील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन वीस लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून 20.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 11.7% नी वाढलेले आहे.
या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक संकलन 1.68 लाख कोटी रुपये आहे, जे मागील वर्षाच्या 1.5 लाख कोटीच्या सरासरीला मागे टाकणारे आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मार्च 2024 पर्यंत परताव्यानंतर जीएसटी महसूल 18.01 लाख कोटी रुपये आहे जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.4% ने वाढलेले आहे.