लहान करदाते यांना सोयीची असणाऱ्या कंपोझिशन योजनेची निवड कर दाते 31 मार्च 2024 पर्यंत वस्तू आणि सेवा कर पोर्टलमध्ये CMP-02 फॉर्म भरून करू शकतात असे वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) ने जाहीर केले आहे.
मात्र जे कर दाते या योजनेचा सध्या लाभ घेत आहेत त्यांनी सदर फॉर्म CMP -02 भरण्याची गरज नाही.
वस्तू आणि सेवा कर कंपोझिशन योजना ही कर आकारणीची एक पर्यायी पद्धत आहे. वस्तूंचा तसेच रेस्टॉरंट/आऊटडोर केट्रींग या सेवांचा पुरवठा , ज्यांची उलाढाल रु.दीड कोटी पर्यंत आहे (काही राज्यांच्या बाबतीत रु. ७५ लाख ) तर सेवांचा पुरवठा ज्यांची उलाढाल रु. ५० लाखा पर्यंत आहे , अशा लहान करदात्यांचा अनुपालन खर्च कमी करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
शिवाय, हे ऐच्छिक आहे आणि या योजनेअंतर्गत कर भरण्याची निवड करणारी पात्र व्यक्ती सामान्य दराने कर भरण्याऐवजी प्रत्येक तिमाहीत त्याच्या उलाढालीच्या विहित टक्केवारीने कर भरू शकते. वर्षातून एकदाच वार्षिक विवरण पत्र दाखल करू शकते.या योजनेत तीन विशिष्ट वस्तू वगळता इतर वस्तूंच्या पुरवठया वर 1 % , रेस्टॉरंट/ आऊटडोर केट्रींग सेवांवर 5% तर इतर सेवांसाठी 6% इतका दर आहे.
या योजने अंतर्गत कर दाते कर आपल्या ग्राहकाकडून जमा करू शकत नाहीत. त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येत नाही किंवा पास करता येत नाही.