कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या मालेगाव शहरातील नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला नुकतेच पकडण्यात आले असल्याचे राज्यकर विभागांतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मालेगाव हे महाराष्ट्रातील प्रमुख टेक्सटाईल हब आणि एमएसएमई उद्योगाचे केंद्र आहे. सदर संशयित बुरड हे नोंदणीकृत (जीएसटी) कर सल्लागार आणि (जीडीसीए) आहेत जे विविध व्यावसायिकांना नवीन (जीएसटी) नोंदणी आणि नियतकालिक (जीएसटी) रिटर्न भरण्यास मदत करतात.
उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा मासिक डेटा सदर व्यक्तीस सहज उपलब्ध होता आणि या डेटाच्या मदतीने या व्यावसायिकांचे मासिक विवरणपत्र भरत होता. या प्रक्रियेदरम्यान संशयित या करदात्यांच्या नियमित उलाढालीमध्ये इतर बोगस उलाढाल जोडत होता आणि काही व्यावसायिकांच्या माहिती शिवायही बनावट पावत्या आणि त्यांच्या नोंदी जीएसटी आर (1) मध्ये जारी करत होता.
या बनावट इनव्हॉइसचा वापर इतर करदात्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे वास्तविक कर दायित्व कमी करण्यासाठी किंवा काही प्रकरणांमध्ये ‘इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर’मध्ये काल्पनिक आणि बोगस परताव्याचा दावा करण्यासाठी केला गेला.
बोगस सूत व्यापाराशी संबंधित कापड व्यापारी आणि उत्पादकांच्या या संपूर्ण क्लस्टरची चौकशी राज्य कर विभागाच्या मुंबई कार्यालयातील २० हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने मालेगावातील १७ वेगवेगळ्या संस्थांवर छापे टाकले होते.
विभागाने शहरातील कर व्यावसायिकांचा अंतिम सहभाग सिद्ध करून हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळवले. या बनावट पावत्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात बोगस परतावा मिळविला जात असल्याचा संशय आहे.
विभागाकडून नोंदणीकृत वस्तू व सेवाकर कर सल्लागाराची ही पहिली अटक असेल जिथे व्यावसायिक सल्लागाराचा फसव्या व्यवहारांशी थेट संबंध उघडकीस आला. प्राथमिक तपासात स्वतः सदर सल्लागाराने (GSTP) यांनी ९ वेगवेगळ्या संस्थांचा वापर करून ८६.६० कोटी पेक्षा जास्त किमतीच्या बोगस पावत्या जारी केल्या आहेत आणि त्याद्वारे एकूण १०.३९ कोटी रुपयांच्या बनावट (ITC) इनपुट टॅक्स क्रेडिट पास केल्या आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.