GST Tax Notice: ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना पाठवल्या 1 लाख कोटी रुपयांच्या कर नोटिसा, काय आहे कारण ?

GST 4 YOU


GST Tax Notice: ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना पाठवल्या 1 लाख कोटी रुपयांच्या कर नोटिसा, काय आहे कारण ?

ऑनलाइन गेमिंगवर 28% जीएसटी लागू झाल्यापासून गेमिंग कंपन्यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. माहितीनुसार, भारतीय जीएसटी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 1 लाख कोटी रुपयांच्या नोटिसा बजावल्या आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. 1 ऑक्टोबरनंतर भारतात नोंदणीकृत विदेशी गेमिंग कंपन्यांचा कोणताही डेटा अद्याप उपलब्ध नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

गेमिंग कंपन्यांना भारतात नोंदणी करणे अनिवार्य

सरकारने जीएसटी कायद्यात सुधारणा केली असून, परदेशी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून भारतात नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. GST परिषदेने ऑगस्टमध्ये स्पष्ट केले होते की ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर 28 टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) लावला जाईल.

कर न भरल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली

अधिका-याने सांगितले की, "आतापर्यंत सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या नोटिसा GST अधिकार्‍यांनी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना पाठवल्या आहेत." ड्रीम 11 सारख्या अनेक ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म आणि डेल्टा कॉर्प सारख्या कॅसिनो ऑपरेटरना कर न भरल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.


गेमिंग प्लॅटफॉर्म गेम्सक्राफ्टला 21,000 कोटी रुपयांच्या कथित GST चोरीप्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता.